Tuesday, March 16, 2021

School Activities : शालेय उपक्रम

 School Activities : शालेय उपक्रम

       शालेय शिक्षण आणि शालेय उपक्रम या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक, समांतर आणि संलग्न आहेत. शिक्षण नुसते पुस्तकी ज्ञान देऊन पूर्ण होत नाही. शिक्षणाला खरा अर्थ तेव्हा प्राप्त होतो, जेव्हा अर्थपूर्ण असे शिक्षण प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून दिले जाते. हे अर्थपूर्ण शिक्षण तेव्हाच पूर्ण होते, जेव्हा तुम्ही शालेय स्तरावर वेगवेगळे मनोरंजक उपक्रम घेतात. तुम्ही घेतलेले उपक्रम परिसरानुसार, परिस्थितीनुसार, विध्यार्थी हित जोपासत घेतले तर अधिक प्रभावी ठरतात. 

                   मार्च 2020 पासून COVID-19 या महामारीमुळे शाळा बंद झाल्या. या कालावधीत विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा कशा पूर्ण करता येतील या विषयी केलेला छोटासा प्रयत्न.......

School Activities: शालेय उपक्रम


प्रस्तावना:- 

 

           मार्च 2020 या महिन्याची सुरुवात आणि…….पूर्ण जग एका ठिकाणी एका निर्जीव वस्तू प्रमाणे स्तब्ध झाले. त्याचे मुख्य कारण म्हणजे covid-19 हा जीवघेणा संसर्गजन्य रोग. या रोगाने अल्पावधीतच इतका थैमान  माजवला की जागतिक आरोग्य संघटना ( WHO ) ला या रोगाला  महामारी म्हणून घोषित करावे लागले आणि सुरू झाले lockdown.

 

         Lockdown  चा परिणाम म्हणून जगातील लहान-मोठी सर्वच शहरे बंद पडली. सोबतच राज्य,जिल्हा, तालुका असे करता करता लहानातली लहान खेडेगाव सुद्धा यादीत आले.

पाहता पाहता  पूर्ण जग lockdown च्या छायेत आहे. Lockdown चा ज्याप्रमाणे छोट्या-मोठ्या सर्व कामावर परिणाम झाला, त्याचप्रमाणे त्याचा फटका शाळेवर ही बसला. जगातील सर्वच शाळा, महाविद्यालये बंद पडल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण मात्र ऐरणीवर आले.

          अशातच नेहमीप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2020-21 जून 2020 या महिन्यात सुरू झाले. महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने 'शिक्षण महत्वाचे' म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, याकरिता बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 या संदर्भाचा विचार करून वर्गातील शिक्षणाला पर्याय म्हणून Online शिक्षणाला प्राधान्य दिले.

               Online शिक्षण सुरू झाल्यामुळे त्यासाठी लागणारे साहित्य (smartphone, laptop, educational app) याची पालकांकडून जमवाजमव सुरू झाली. राज्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्याना  stay at home म्हणत घरबसल्या ऑनलाइन शिक्षण मिळू लागले. ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय शिक्षकांसाठी घरबसल्या शिक्षण देणे यामुळे फायदेशीर होऊ लागला. राज्यातील प्रत्येक शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाइन शिक्षण देऊ लागले. त्यासाठी……

WhatsApp वर  Link share करणे,

Zoom meeting

Google meet

Educational video

YouTube educational video.

या पद्धतीचा सर्रास वापर होऊ लागला. या शिक्षणाला आधार म्हणुन काही NGO संस्थाही शिक्षणासाठी मैदानात उतरल्या. 

              ज्या विद्यार्थ्यांकडे smartphone , laptop याची उपलब्धता होती त्या विद्यार्थ्यांनी अति आनंदामध्ये ऑनलाइन शिक्षण घेतले आणि घेत आहे. काही अंशी पालकात विरोध जरी असला तरी शिक्षण महत्त्वाचे म्हणून प्रत्येक शाळेतील विद्यार्थी घरबसल्या ऑनलाइन प्रशिक्षणात सहभागी होऊ लागला.

            ऑनलाईन शिक्षण तर सुरू झाले पण खरी अडचण तिथे सुरू झाली

ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन उपलब्ध नाही.

ज्या परिसरात मोबाईल नेटवर्क(coverage) उपलब्ध नाही.

ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन उपलब्ध नाही. ज्या परिसरामध्ये मोबाईल नेटवर्क उपलब्ध नाही. 

त्यांनी काय करावे? त्यांनी शिक्षण कसे घ्यावे?

हा मोठा प्रश्‍न ऐरणीवर लटकू लागला.

            स्मार्टफोन उपलब्ध नसणे, परिसरामध्ये मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसणे याला पर्याय म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने ऑफलाइन (Offline) शिक्षण पद्धत राबविण्याचे जाहीर केले. त्यासाठी प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी स्मार्टफोन नसेलेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार करणे. मोबाइल नेटवर्क नसेलेल्या परिसराची माहिती मिळवणे आणि त्या परिसरामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन ऑफलाइन पद्धतीने शिकवण्याची सुरुवात झाली.

 

ऑफलाइन शिक्षण देण्यासाठी आवश्यक असलेले संदर्भसाहित्य म्हणून…...

 

पाठ्यपुस्तके

स्वाध्याय पुस्तिका

Download केलेले शैक्षणिक व्हिडिओ.

आणि

इतर साहित्य

या साहित्यांचा वापर करून offline शिक्षण सुरु झाले.

 

        ऑफलाइन शिक्षण सुरू तर झाले परंतु अतिदुर्गम भागात शिक्षकांना शिक्षणाचा जम काही बसेना. त्याचे कारण म्हणजे …...

 • अतिदुर्गम भाग
 • डोंगरदऱ्यांचा परिसर
 • विद्यार्थ्यांची विस्तारलेली घरे
 • दोन घरांमधील दूर-दूरचे अंतर
 • सकाळपासूनच घराची दारे बंद करून कुटुंब शेतावर किंवा जंगल रानात निघून जाणे. 

कुटुंबचे कुटुंब घर बंद करून आपापल्या शेतावर डोंगरदऱ्यात गेले असल्यामुळे 'शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी पण विद्यार्थी ना घरी'असे होऊ लागले. विद्यार्थी त्यांच्या घरी न भेटणे असे नेहमीच होऊ लागल्याने offline शिक्षण अडचणीचे होऊ लागले. अशावेळी आपली नेहमीची शाळा भरणेच  योग्य असे शिक्षकांना वाटत असे. शिक्षक दररोज विद्यार्थ्यांची दारी जात असे पण एक किंवा दोन विद्यार्थी व्यतिरिक्त बाकी सर्व विद्यार्थी पालकांसोबत शेतावर किंवा गुरं-ढोरं चारण्यासाठी जंगलात जात असल्याने त्यांची भेट काही  होत नसे. 

       ऑफलाइन शिक्षण देण्याच्या तारेवरच्या कसरतीला कायमचा मार्ग कोणता काढता येईल का? उपलब्द स्थानिक परिस्थितीशी समायोजन साधून शिक्षणाच्या प्रवाहात आपण येऊ शकतो का

भविष्यात covid -19 या महामारीसारखी परिस्थिति उद्भवल्यास शाळा बंद असल्या तरी पर्यायी शिक्षण व्यवस्था किवा पूरक उपक्रम घेता येऊ शकतात का? या विचारात मी होतो. एका दिवशी मित्र शिक्षक श्री दिपक वसावे सर यांच्या बरोबर सहज गप्पा गप्पांमध्ये सुचलेला मार्ग म्हणजेच शिक्षण महत्वाचे  हा छोटासा उपक्रम.

उद्दिष्टे-

 

राज्यात १७ मार्च २०२० पासून lockdown ला सुरुवात झाली. Lockdown चा परिणाम म्हणून शाळा बंद झाल्या.  शिक्षण महत्त्वाचे म्हणून ऑफलाइन - ऑनलाईन शिक्षण सुरू झाले . परंतु अतिदुर्गम भागात ऑफलाइन शिक्षण देणे हे जिकरीचे झाले होते. शिक्षण महत्त्वाचे आहेतच परंतु विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात असणे ही तितकेच महत्त्वाचे होते. आपण पाहतोच….असे कितीतरी विद्यार्थी एक दोन दिवसाच्या सुट्ट्यात गावाकडे गेली की शिकवलेले दोन-तीन दिवसात विसरतात. covid-19 या महामारीमुळे निर्माण झालेल्या lockdown चा कालावधी हा मोठा असल्यामुळे कितीतरी विद्यार्थी मार्च 2020 पूर्वी शिकवलेले आज विसरून बसलेले आहेत. पालकांच्या मागोव्यात असल्यामुळे पाठ्यपुस्तकांना हात लावणेही विद्यार्थी विसरून बसलेले होते. दिवसभर शेतात जंगलात गुरेढोरे यांच्यामागे असल्यामुळे साधे अंक, अक्षरे, शब्दसुद्धा काही विद्यार्थ्यांना अनोळखी होऊन बसलेले होते.

अशावेळी

 • विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे.
 • विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांची आठवण करून देणे.
 • शैक्षणिक संदर्भाची जाणीव करून देणे.
 • आरोग्य विषयक सवयी व निरोगी राहण्याचे फायदे समजावणे.
 • वाचन गणन लेखन यांचा सराव देणे.
 • शिक्षणाची आवड निर्माण करणे.
 • वेळेचा सदुपयोग लक्षात आणून देणे.
 • संबोध स्पष्ट करता येणे.
 • परिसरातील वस्तू , साधनांचा शैक्षणिक साहित्य म्हणून वापर करता येणे.

 

           अशी साधी-सोपी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून उपक्रमाची सुरुवात झाली.

 

 

 

उपक्रमात सहभागी गट व संख्या:-

 

                       जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोपलाईपाडा केंद्र-वालंबा (H) ,ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार 

या माझ्या शाळेत पहिली ते चौथी चे एकूण चार वर्ग आहेत. यात विशेष म्हणजे शाळेची निर्मिती झाल्यापासून आजतागायत शाळेला वर्गखोली (इमारत) नाही. शाळा एका खाजगी (भाडे विरहित) कुडाच्या घरात भरते. शाळेत पहिली ते चौथी या वर्गांना मुले-मुली मिळून एकूण 18 विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे.

 

      उपक्रमासाठी शाळेतील कोणत्याही विशेष गट किंवा इयत्तांचे बंधन नाही. शेतात किंवा जंगलात गुरंढोरं चारण्यासाठी गेलेले विद्यार्थी आपल्या गुराढोरांना दुपारी पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर आणतात. ११:३० ते १:३० वाजेच्या दरम्यान पाणी पिऊन सर्व गुरंढोरं आणि गुराखी ( विध्यार्थी ) झाडाखाली आराम करत असतात. या

ठिकाणाला गोठाण असं म्हटलं जातं. गोठाणावरील दीड ते दोन तासाचा कालावधी मुलं खेळणे आणि मौजमजा करण्यात घालवत असतात. याच वेळेचा सदुपयोग लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना गोठाणावरील शैक्षणिक गंमतीजंमतीचा आनंद दिला जातो. 

 

उपक्रमाचा कालावधी:-

 

17 मार्च 2020 पासून covid-19 या महामारी चा वाढता प्रभाव पाहता राज्यात सर्वत्र लॉकडाउन ची सुरुवात झाली. राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये ऑफलाइन किंवा ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर होत आहे. माझ्या शाळेत विद्यार्थ्यांकडे smartphone नसल्यामुळे आणि परिसरात मोबाइल नेटवर्क (coverage) नसल्यामुळे ऑफलाइन पद्धतीने शिक्षण देणे चालू आहे. परंतु विद्यार्थी घरी भेटत नसल्यामुळे ऑफलाइन शिक्षण देणे अडचणीचे होऊ लागले. ऑफलाइन शिक्षणाला पर्याय म्हणून या उपक्रमाची निवड करण्यात आली. पावसाळ्यात या उपक्रमाचा वापर करता आला नाही. पाऊस बंद झाल्यामुळे ऑक्टोबर 2020 पासून टप्प्याटप्प्याने या उपक्रमाची सुरुवात झाली आणि आजपर्यंत हा उपक्रम सुरू आहे.

 

उपक्रमाची टप्पे (उपक्रमाची प्रत्यक्ष कार्यवाही ) 

 

           ऑफलाइन शिक्षणाची सुरुवात झाली खरी परंतु विद्यार्थी मात्र एक-दोन वगळता घर भेटीत भेटत नव्हते. विद्यार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष भेटी दरम्यान बहुतेक विद्यार्थ्यांचे घराचं दार बंदच असे. विद्यार्थ्यांच्या घराच्या शेजारील घरात चौकशीत समजले काही विद्यार्थी पालकांना शेतीकामात मदत म्हणून शेतावर गेलेत,

 तर काही विद्यार्थी घरातील बकर्‍या बैल व इतर पाळीव प्राणी चारण्यासाठी जंगलात गेले.

मी माझ्या शाळेचे मुख्याध्यापक श्री रतनसिंग वळवी सर यांच्या सोबतीने सहज म्हणून एका दिवशी विद्यार्थ्यांच्या शेतावर गेलो. पालकांना भेटलो, शिक्षणावरती गप्पा केल्या. गप्पा अंती समजले शाळा तर बंदच आहेत आमची मुलं आम्हाला हातभार लावत आहेत असे पालकांकडून ऐकायला मिळाले. विद्यार्थ्यांना शिक्षण देणे गरजेचे आहेतच परंतु विद्यार्थ्यांच्या शेतावर जाऊन किंवा जंगलात गुरंढोरं चारण्यासाठी गेलेल्या जागेवर जाऊन शिक्षण देणे थोडे अवघड व जिकरीचे वाटले.

           एका दिवशी गावातील काही मोठ्या मुलांकडून समजले गुरंढोरं चालणारी मुलं दुपारी पाणवठ्यावर एकत्र जमतात व खूप गमतीजमती करत असतात. 

           ही एक संधी म्हणून एका दिवशी दुपारी सहज पाणवठ्यावर गेलो. ओढ्याचं पाणी वाहत वाहत एका सखल भागात साचत वाहते व ओढ्याच्या काठावर लहान मोठी झाडं असं ते  ठिकाण होतं. सकाळी ७:०० वाजता घरातून सुटलेली जनावर पोटभर चारा खाऊन झाल्यावर या पाणवठ्यावर दुपारी १२:०० वाजेच्या दरम्यान जमतात. जनावरांचं पाणी पिऊन झाडाच्या सावलीत विश्रांती घेणे व याच वेळेत गुराखी (विद्यार्थी) घरून आणलेले जेवणाचे डबे उघडतात.

                   या जागेला परिसरात गोठाणाची जागा म्हणून ओळखले जाते.

दुपारी जेवण झाल्यावर १२:०० ते १:३० वाजेच्या दरम्यान मुलं झाडावर चढणे, पळा-पळी करणे, लंगडी खेळणे, पकडापकडी खेळणे  असे किती तरी खेळ खेळत असतात. पहिल्या भेटीत गोठाणावरील माझी उपस्थिती मुलांना आश्चर्याची वाटली. सुरुवातीचे पाच-सहा वेळेस मी दिवसाआड गोठाणावर जाऊ लागलो. मुलांबरोबर गप्पाटप्पा करणे, त्यांचे खेळ पाहणे हे चालू ठेवले. एक दोन आठवड्यानंतर मुलांबरोबर पुस्तक विना शालेय गप्पा सुरु केल्या. त्यानंतर पुस्तक विना शिक्षण सुरू झाले.

दररोज दुपारी १२:०० ते १:३० वाजेच्या दरम्यान आमच्या गोठाणावरील शैक्षणिक गमतीजमती सुरू झाल्या.

त्यात…

 • बैल मोजणे.
 •  बकऱ्या मोजणे.
 • गाई मोजणे. 
 • म्हशी मोजणे. 
 • गाय, बैल, म्हैस,बकरी यांची शिंगे, शेपूट मोजणे.

असे सहजसोपे गमतीशीर खेळ सुरू केले.

 

त्यानंतर…..

 • झाडाची पाने ओळखणे.
 •  झाडांची नावे सांगणे. 
 • झाडे-झुडपे यांच्यातील फरक सांगणे. 
 • ओढ्यावर पाणी अडवणे. 
 • छोटे मातीचे (वाळूचे) बंधारे बांधणे.
 • गोल आकाराचे दगड-गोटे जमविणे. 
 • पाळीव प्राणी यांची ओळख,त्यांचे फायदे, महत्त्व सांगणे. 
 • परिसरातील झाडांची पाने, दगड-गोटे,काड्या यांना एकत्र करून गणितीय क्रिया (बेरीज, वजाबाकी,गुणाकार, भागाकार) यांचा शाब्दिक व प्रात्यक्षिक सराव घेणे.
 •  भाकरी पोळ्या यांचा वापर करून पाव, अर्धा, पाऊन, पूर्ण यांचा संबोध समजवणे. 
 • भाषा व इंग्लिश विषयाची मागील इयत्तांची कविता-गाणी,Rhymes यांचे गायन करणे.
 • परिसरातील लोकगीत गायन करणे. 
 • मैदानी खेळ खेळणे.
 • आजी-आजोबांनी सांगितलेल्या कथा गोष्टी सांगणे. 
 • शालेय पाठ्य पुस्तकातील गोष्टी सांगणे.

अशा स्वरूपाचे असंख्य खेळ, गमतीजमती जे मुलांना सुचतील आवडतील ते गोठाणाच्या शाळेत सुरू झाले.

 

अडचणी :-

         या उपक्रमाच्या सुरुवातीला मुलं पाच ते सहा यापेक्षा जास्त जमायची नाही. डोंगरदऱ्यांच्या परिसर दूर दूर असलेली घरं आणि शेती त्यामुळे विद्यार्थी जमणे कठीण होऊ लागले.परंतु हळूहळू विद्यार्थ्यांनी घरी जाऊन आपल्या मित्रांना सांगितल्यामुळे जे गुरंढोरं चारत नव्हते ते व मोठ्या वर्गातील विद्यार्थी ही गमतीजमतींचा आनंद घेण्यासाठी गोठाणावर हजर होऊ लागले.

 

परिणाम:-

     मार्च 2020 या महिन्यापासून शाळा covid-19 यामुळे महामारी मुळे बंद आहेत. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होते. सोबत पाठ्यपुस्तके असतानाही परिसरात व घरात शैक्षणिक वातावरण नसल्यामुळे विद्यार्थी पाठ्यपुस्तकांना हाताळत नव्हती. पालकांबरोबर शेतात जाणे, काहीच काम नाही म्हणून गुरंढोरं चारणे ही कामे ते मागील पाच सहा महिन्यापासून करत होते. परिणाम म्हणून विद्यार्थी शिक्षण, पाठ्यपुस्तक पासून दुरावली होती. वाचन-लेखन विसरले होते.गोठाणावरील शैक्षणिक गमतीजमती या उपक्रमाची सुरुवात झाल्यामुळे पाठ्यपुस्तक सोबत नसतानाही विद्यार्थ्यांना शाळा व शिक्षणाची आठवण, आवड येण्यास मदत झाली. कथा-गोष्टी गाण्यांच्या सरावामुळे पाठ्यपुस्तकांची आठवण होण्यास मदत होऊ लागली.

  एकंदरीत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांची आठवण करून देणे, वाचन-लेखन-गणन यांचा सराव होणे हे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत झाली.

 

 

निष्कर्ष :-

 

शिक्षण महत्वाचे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना

 • शाळेची आठवण येण्यास मदत झाली.
 • दरोजचे गमतीजमतीचे शिक्षणाशी संबंधित खेळ असल्यामुळे  पाठ्यपुस्तक विना शाळा सुरू असल्याची जाणीव विद्यार्थ्यांना होऊ लागली. 
 • वर्गाचे व दप्तराचे कोणतेही दडपण नसल्याने आनंददायी शैक्षणिक हालचाली होण्यास मदत झाली. 
 • गाणी- गोष्टी यांचा दररोजचा सरावामुळे गायनाची आवड व पाठांतरास मदत होऊ लागली.
 • गुरांचे पाय / कान मोजून पाढे तयार करण्याचा सराव होऊ लागला. 
 •  मित्रांच्या पाठीवर अक्षरे गिरवणे,वाळू पाटीचा वापर, धूळपाटी प्रमाणे मातीवर अक्षरे रेखाटणे,झाडाच्या मोठ्या आकाराच्या पानांवर काडीने अक्षरे गिरवणे अशा सरावामुळे मुलांना लेखनाचा सराव होण्यास मदत होऊ लागली. 
 • खाणा-खुणांची भाषा अवगत होऊ लागली.
 •  दररोजचे खेळ व मेहनतीच्या कृतीमुळे चांगले आरोग्य, निरोगी शरीर ठेवण्यास मदत झाली. 
 • वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन विषयक जाणिवा निर्माण होऊ लागल्या.
 • झाडांचे उपयोग विषयक माहिती समजू लागल्या. 
 • माती / काड्यांचा वापर करून घर तयार करणे ही नवनिर्मिती अवगत झाली. 
 • बियांचा संग्रह करणे. 
 • पाण्याचे स्त्रोत आणि जलसाठे विषयक प्रत्यक्ष अनुभव मिळाला. 

           एकंदरीत शिक्षण महत्वाचे हा उपक्रम ज्या परिसरामध्ये ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था होऊ शकत नाही. डोंगराळ व अतिदुर्गम भाग असलेला परिसर आहे. विद्यार्थी पालकांबरोबर शेती कामात व्यस्त आहेत. अशा ठिकाणी हा उपक्रम किंवा या सारख्या शैक्षणिक प्रात्यक्षिके करून घेतल्यास विद्यार्थी शाळा बंद असतांनाही शिक्षणापासून वंचित राहणार नाही. विध्यार्थी घर व शेती कामात मदत करत -करत  शिक्षण ही घेत आहे याचे समाधान पालकात राहण्यास मदत होईल. दररोजच्या सरावामुळे विध्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहण्यास मदत होईल.

 

16 comments:

 1. छान उपक्रम आहे.....निसर्गरम्य

  ReplyDelete
 2. खुप छान 💐💐

  ReplyDelete
 3. खूप मेहनत घेतली सर आपण...
  आपल्यापासून खूप शिकण्यासारखे आहे.. धन्यवाद सर..!

  ReplyDelete
 4. अष्टपैलू व उत्साही व्यक्तीमत्व असलेलें श्रीमान गणेश पावरा सरजी, आपले कौतुक करावे तेवढे कमीच. विद्यार्थी शिक्षण प्रवाहात टिकून राहण्यासाठी विपरीत परीस्थितीत मार्ग काढून नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या साहाय्यानं आपण करत असलेले ज्ञानदानाचे कार्य कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. वालंबा केंद्रातील सर्व शिक्षक बंधूंच्या तांत्रिकी समस्या सोडवतांनाच टपाल संकलनाचे कामही आपण ज्या पद्धतींने न कंटाळता पार पाडण्याचं काम आपण करत आहात.खरंच सतत व नेटके काम करण्याचे कसब शिकावं ते तुमच्या कडून. फारच छान उपक्रम सरजी.👌👍

  ReplyDelete
 5. Good work sir.Continue your work in future also Best wishes.

  ReplyDelete