Friday, September 17, 2021

Tourist in satpuda: सातपुड्यातिल प्रेक्षणीय

  Tourist in satpuda: सातपुड्यातिल प्रेक्षणीय

अब आगे क्या ?......Whats Next?...

 

       जून, जूलै व ऑगस्ट महिन्यात पावसाचं प्रमाण अल्प होते. कमी पावसामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी चांगलाच चिंतेत होता. निसर्गाला का कुठून माझ्या शेतकऱ्यांची किव आली. वरूणराजा मागील ८/१० दिवसांपासुन चांगलाच बरसत आहे. चांगल्या आणि दमदार पावसाने आता सर्वच सुखावले आहेत. जिकडे-तिकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती आहे. चांगल्या पावसामुळे सातपुडा पर्वत तर चांगलाच आनंदी झाला आहे. संततधार पावसामुळे डोंगरात जिकडे-तिकडे पाणी झऱ्यांच्या रूपाने वाहत आहे. बहरलेले हिरवागार डोंगर पावसातील धुक्यात अजूनच सुंदर दिसत आहे. रिमझिम पाऊस,पसरलेलं धुकं आणि थंडगार वातावरण पाहता Trip चा बेत आखायला कोणाला आवडणार नाही. 

           पावसाळ्यात सातपुड्यातील डोंगररांगा महाबळेश्वर पेक्षा कमी नाहीत असे वाटते. परंतु संततधार पाऊस व दिवसाही अंधारमय वातावरण त्यातल्यात्यात खराब रस्त्यांमुळे डोंगरातील प्रवास टाळलेलाच बरा असे वाटते. कारण पावसाळ्यात डोंगरात जास्त पाऊस असतो हे सर्वश्रुत आहे. परंतू या आल्हाददायक वातावणाचा आनंद घ्यायचा म्हटला तर प्रवासाला रस्ते चांगले असणे तितकेच महत्त्वाचे. महाबळेश्वरला डोंगर परिसर असून तेथे जास्त पाऊस असतो. अशा परिस्थितीतही तेथे पर्यटक जास्त का जात असतील? उत्तर आहे... प्रवासासाठी चांगले रस्ते हे तुम्ही समजू शकता…..

Tourist in Satpuda

        वरील फोटो पाहून प्रवासातील प्रवाशांचे हाल तुम्हाला उमजून येतील. 

मागील ८/१० दिवसांपासून पावसांने चांगलाच जम बसवलाय. थांबण्याचे नावं काही घेईना. मात्र या पावसात घरातील नेहमीची कामं थांबवून कसं चालणार….

दैनंदिन गरजा भागविण्यासाठी घरातून बाहेर यावेच लागते? त्यातल्यात्यात गरजा शहरांशी जोडलेल्या असतील तर... प्रवास करावाच लागेल. 

       वरील फोटो हा सातपुडा पर्वतातील होराफळी घाट सेक्शन मधील आहे. हा परिसर नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील आहे. दमदार पावसाने घाट सेक्शन मधील रस्ता पुर्ण वाहून गेला आहे. रस्त्याची अवस्था फाटक्या कपड्यांसारखी झाली आहे. ज्याला ठिगळ लावावं तर कुठेत्यातल्यात्यात दैनंदिन गरजा भागविण्यासाठी शहराला येणे भाग पडत असल्याने प्रवासी मात्र चांगलाच अडचणीत आला आहे. 

         सातपुड्यातील रस्त्यांचं रडगाणे मात्र नेहमीचेच झाले आहे. आला पावसाळा की वाहला रस्ता. पण दूरूस्ती मात्र नाही. वारंवार सांगूनही दुरुस्ती जैसे थे. त्यामुळे परिसरातील लोकांनाही याची सवय झाली आहे. कारण अशी स्थिती आजच झाली तर सांगावे. दर वर्षी हेच हाल तर सांगावे कोणाला? जसे..

.चिमणीचं घरटं वाऱ्याने उडाले तर चिमणा-चिमणी कोणी मदत करेल याची वाट पाहत बसत नाही. तर हे माझं मलाच करावे लागेल म्हणून पुन्हा नवीन घरटे स्वतः बनवायला सुरुवात करतात. 

          या कथे प्रमाणे सातपुड्यातील आदिवासीही गरज मलाच आहे. हे समजून रस्त्याची दुरुस्ती स्वतः करतो आणि आपापल्या मार्गी लागतो. सातपुड्यास्थीत आदिवासींचा हा गुण वाखाणण्याजोगा आहे. या सातपुडा पर्वतात रहिवासी म्हणून राहणारा आदिवासी मागील कित्येक वर्षांपासून या परिसरात वास्तव्य करतोय. काही वयस्क व्यक्तींना भेटल्यावर त्यांचे अनुभव खुप काही सांगुन जातात. वर्षानुवर्षे दळणवळणाची स्थिती बदलेली नाही. वरील स्थिती पाहता शासन दरबारी दरवर्षी वेगवेगळ्या योजना व देयके मंजूर होत असतात परंतु ते लोकांपर्यंत पोहोचत नाही असे वाटते. अशाही परिस्थितीत येथील रहिवासी मात्र कुठे मोर्चा, रास्तारोको व इतर धुमाकूळ घातल्याचे ऐकिवात नाही. त्यांचे कारण म्हणजे आत्मनिर्भरता होय. येथील रहिवासीत आत्मनिर्भरता हा गुण ठासून भरलेला दिसून येतो. काहीही विपरीत घटना घडल्या तर सर्वप्रथम स्वतः ते मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतो. त्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न पणाला लावतो. सर्व प्रयत्न करूनही यश मिळाले नाही तर कुठेतरी शासन दरबारी कळवले जाते. पण शासन कडून मदत मिळेल यावर ठाम विश्वास मात्र ठेवत नाही. कारण आज पर्यंतचे अनुभव. दरवर्षी पावसाळ्यात हेच हाल होतात आणि पुन्हा परिसरातील लोकं फावडे घेऊन रस्ता दुरूस्ती करतात. हे वर्षानुवर्षे चालत आलेलं सत्य. 

 

              आता आजच्या लेख ला दिलेल्या Heading कडे वळूया…

                 आपण खुप साऱ्या चित्रपटात हे वाक्य ऐकले असेल. अब आगे क्या?….  चित्रपटात तशा परिस्थितीत निर्माण केल्या जातात व तसे चित्रीत करुन पडद्यावर झळकवले जाते. आपणही तितक्याच खुबीने ते पाहतो व वाहव्वा करतो. परंतु अशा परिस्थिती जर प्रत्यक्षात घडल्या तर सामोरे जातांना आपली भंबेरी उडल्याशिवाय राहणार नाही. 

       वरील फोटोतील रस्ता जर तुमच्या नेहमीच्याच प्रवासातील असेल तर कितीही पाऊस व धुकं पडलं तरी तुम्हाला अब आगे क्या? हे माहिती असते. त्यामुळे तुम्ही न घाबरता प्रवास करतात. परंतु प्रवासी जर नवखा असेल तर? तुम्ही समजू शकता? खराब खड्ड्यांचा रस्ता, पुढील वळण कसं असेल हे माहिती नसेल आणि डोंगरातून वाहणाऱ्या सरी आपल्या सोबत मातीही वाहुन आणत असतील तर ते दृश्य किती भयावह असेल. अशावेळी डोंगर खचण्याची मोठी भिंती असते. अशात तुमच्या दैनंदिन गरजा प्रवासाशिवाय भागत नसतील, तो प्रवास तुमच्या कुटुंबासह करणे पर्याय नसेल तर….विचार करणं किती अवघड ???…...

      या परिसरात प्रेक्षणीय स्थळे खुप आहेत. जसे की उंचावरून कोसळणारा धबधबा, देवस्थान, घनदाट वृक्षांची जंगले, काही जंगली प्राणी, हिल स्टेशन, वळणावळणाची रस्ते आणि शांत व मीतभाषी तसेच जंगल जमीनीशी आजही नाते जोडलेला येथील रहिवासी. आजही येथे वास्तव्यास असलेला आदिवासी आपली परंपरा व जल,जंगल,जमीन हेच माझे दैवत मानत आलेला आहे. सातपुडाच्या पर्वत रांगेत पाहण्यासाठी खुप मजेदार ठिकाणे आहेत. परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या वनभाज्या तर खुप प्रसिद्ध आहेत. फक्त गरज आहे ती म्हणजे चांगले रस्ते, संदेशवहन ( mobile coverage) व काही पर्यटकांसाठी लागणाऱ्या सुविधा. 

   इतका देखणा परिसर असतांना फक्त काही अपुऱ्या सुविधेमुळे निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी मन तर तयार होते. परंतू अपुऱ्या सुविधा आणि कोसळणारा पाऊस आणि अंधारमय वातावरणात पडलेलं धुकं पाहता अब आगे क्या ….हा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही.

 

 

 

 

4 comments: